मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा – अशोक चव्हाण

0
941

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ठोस तोडगा काढण्यासाठी मुंबईत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. चासढकल केल्यानेच राज्यात उद्रेक झाला आहे, असा आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली. मराठा संघटनांच्या नेत्यांनी चर्चेला यावे, आपण चर्चेस तयार आहोत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची ही भूमिका फेटाळून लावली आहे. आतापर्यंत बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. आता कृती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी तोडगा काढण्यासाठी मुंबईत एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आहे, असे चव्हाण म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी बेताल विधाने करणे सोडावे’ मराठा समाजाच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाचा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे, असे चव्हाण यांनी जाहीर केले. सरकारने मराठी समाजाची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बेताल विधाने करणे सोडून द्यावे, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.