Maharashtra

मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचे सत्र कायम; बीडमध्ये ३५ वर्षीय तरूणाची आत्महत्या  

By PCB Author

July 31, 2018

बीड, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षण, बेरोजगारी आणि बँकेचे कर्ज  या कारणास्तव पुन्हा एका तरुणाने आत्महत्या केली आहे. बीड जिल्ह्यातील विडा गावात अभिजीत देशमुख नावाच्या तरुणाने घराजवळच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि बेरोजगारी आदी कारणाचा  उल्लेख करण्यात आला आहे.

३५ वर्षीय अभिजीत एमस्सी झाला आहे. मात्र, नोकरी नसल्यामुळे तो नाराज झाला होता.  नोकरी नाही आणि पैसा नसल्यामुळे व्यवसायही करता येत नाही,  अशी नाराजी त्यांने मित्रांशी बोलताना व्यक्त केली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही पाचवी आत्महत्या आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात २२ जुलैला काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर २४ जुलैला औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केले होते.

२९ जुलैला नांदेडमधील दाभड येथील कचरु दिगंबर कल्याणे या ४२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर  ३० जुलैला औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी इथे राहणाऱ्या प्रमोद होरे पाटील या ३१ वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.