मराठा आरक्षणावर आज उच्च न्यायालयात अंतिम निकाल

0
446

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात चार याचिका विरोधात आणि दोन याचिका समर्थनार्थ दाखल झाल्या आहेत. तर एकूण २२ हस्तक्षेप अर्ज दाखल झाले आहेत. ज्यामध्ये १६ अर्ज आरक्षणाच्या समर्थनात तर ६ अर्ज विरोधात आहेत असेही समजते आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांचे खंडपीठ आज या प्रकरणी निर्णय देणार आहे.

राज्यातील मराठा समाजाला नोकऱ्या व शैक्षणिक अभ्यासक्रमांतील प्रवेशात १६ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात व समर्थनात करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर ६ फेब्रुवारीपासून जवळपास रोज सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी या याचिकांबाबतचा आपला निर्णय राखून ठेवला होता. यानंतर मे महिन्याच्या सुट्ट्या आल्याने मराठा आरक्षणावरील याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी केला. त्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका जयश्री पाटील, संजीत शुक्ला, उदय भोपळे यांच्यासह काहींनी केल्या. तर वैभव कदम, अजिनाथ कदम, अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यासह अनेकांनी कायद्याच्या समर्थनार्थ याचिका दाखल केल्या.