Banner News

मराठा आरक्षणावरील शरद पवारांच्या दुटप्पी राजकारणावर आवाज उठवा – मुख्यमंत्री

By PCB Author

August 03, 2018

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठिंबा जाहीर करतात. तर त्यापूर्वी देशात आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असेही मत मांडतात. तर दुसरीकडे घटनादुरुस्तीला मदत करू, असेही जाहीर करतात. हा लोकांमध्ये भ्रम तयार करण्याचा प्रकार असून त्यांचा हा दुटप्पीपणा आहे. याविरोधात आवाज उठविला पाहिजे, असा सूर भाजप आमदारांच्या बैठकीत निघाला.  

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी दादर येथील वसंत स्मृती या मुंबई भाजपच्या कार्यालयात पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. यावेळी सर्व आमदारांनी शरद पवार यांच्या दुटप्पी राजकारणावर आवाज उठवण्याची मागणी लावून धरली.

राज्य सरकारने गेल्या वर्षभरात मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिक मदत करण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्याचा मराठा समाजाला लाभ  झाला  आहे. याबाबतची माहिती आपापल्या मतदारसंघात आक्रमकपणे पोहचवावी . त्याचबरोबर योजनांची  प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक आमदाराने मतदारसंघात मदत केंद्र सुरू करावे, असाही यावेळी निर्णय घेण्यात आला.

घटनेमध्ये मागास समाजांना आरक्षण देण्याची तरतूद असल्याने  मराठा समाजालाही  आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आरक्षणाबाबत पवारांकडून सुरू असलेल्या दुटप्पी विधानांबाबत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी भूमिका विदर्भातील एका आमदाराने घेतली. यास इतर  आमदारांनी सहमती दर्शवली.

यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व भाजप आमदारांनी एकमत व्यक्त केले. तसेच आपापल्या मतदारसंघांत आंदोलनाची काय परिस्थिती आहे, याची माहिती आमदारांनी बैठकीत दिली. काही ठिकाणी विरोधी पक्षातील लोकांनी आंदोलकांची दिशाभूल करून हिंसेला प्रवृत्त केले, असेही काही आमदारांनी सांगितले. तर काही भागांत आंदोलकांनी विरोधकांनाही हुसकावल्याचे  आमदारांनी सांगितले.