Maharashtra

मराठा आरक्षणाला आव्हान; सोमवारी हायकोर्टात याचिका?

By PCB Author

December 01, 2018

मुंबई, दि. १ (पीसीबी) – सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्याचे विधेयक राज्य सरकारने विधिमंडळात मंजूर करून घेतले असले तरी आरक्षणविरोधकांनी याप्रश्नी कायदेशीर लढ्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या विधेयकाला राज्यपालांनी शुक्रवारी मंजुरी दिल्याने त्याला सोमवारीच मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार विरोधकांनी केला आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने १९९२मध्ये दिलेल्या निवाड्यानुसार एकूण ५० टक्क्यांपुढे आरक्षण देण्यावर निर्बंध आहेत. त्याचे उल्लंघन करून राजस्थानमध्ये गेल्या वर्षी राज्य सरकारने विशिष्ट समाजाला आरक्षण दिले असता त्याला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. राजस्थान उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयांचे निवाडे लक्षात घेऊन राज्य सरकारच्या आरक्षण कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले असता, सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पीठाने १३ नोव्हेंबर २०१७ रोजी अंतरिम आदेश देताना राज्य सरकारला ५० टक्क्यांच्या मर्यादेपुढे कोणत्याही समाजाला आरक्षणाचे लाभ देण्यास स्पष्ट मनाई केली. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन ५० टक्के मर्यादेच्या पुढे जाऊन महाराष्ट्रातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाकरिता १६ टक्के आरक्षण देण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या विधेयकाला मंजुरी देऊ नये आणि त्याला स्थगिती द्यावी’, अशी विनंती करणारे पत्र ‘इंडियन कॉन्स्टुट्युशनलिस्ट कौन्सिल’च्या सदस्य डॉ. जयश्री पाटील यांनी अॅड. गुणरतन सदावर्ते यांच्यामार्फत शुक्रवारी तातडीने राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना पाठवले होते.

मात्र, राज्यपालांनी संध्याकाळी या विधेयकावर स्वाक्षरी करून त्याला मंजुरी दिल्याने मराठा आरक्षणाला कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता या कायद्याला सोमवारी, ३ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात याचिका करून आव्हान देणार असल्याचे अॅड. गुणरतन सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.