मराठा आरक्षणामुळे ओबीसी हिताला बाधा

0
945

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या संघटनांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. मराठ्यांची आरक्षणाची मागणी अवास्तव असल्याचा आक्षेप ओबीसी संघर्ष समितीने घेतला आहे. मराठा जातीसह इतर कोणत्याही जातीचा संघर्ष समिती दुस्वास करत नाही. जातीभेदाच्या विरोधात असलो तरीही मराठा समाजाच्या या मागणीमुळे ओबीसींच्या हिताला बाधा येत असल्याने हा विरोध दर्शवत असल्याची भूमिका समितीने घेतली आहे. 

राज्यातील ओबीसींची परिस्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. एकीकडे सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्याचवेळी मराठा समाजही आता ओबीसींच्या तंबूत घुसू पाहत आहे. त्यामुळे यापूर्वी आरक्षण कोणत्या निकषांवर देण्यात आले, त्यासंदर्भात कायदेशीर बाबी कोणत्या आहेत याचा विचार न करता सरकारवर दबाव आणून मराठा समाज आरक्षण मिळवू पाहत आहे, असा आरोप ओबीसी संघर्ष समितीने केला आहे.

सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी आरक्षण देण्यात येते. सामाजिक, आर्थिक समानता आणायची असेल तर त्यासाठी व्यापक आर्थिक धोरणांचा आग्रह सरकारकडे धरणे गरजेचे आहे. राज्यसरकारही मराठा क्रांती मोर्चाच्या दबावाला बळी पडून राज्य मागासवर्ग आयोगाचा कौल घेते, यावरही संघर्ष समितीने ताशेरे ओढले आहेत.