Maharashtra

मराठा आरक्षणाबाबत सरकारने जनतेची माफी मागावी – पृथ्वीराज चव्हाण

By PCB Author

August 05, 2018

कोल्हापूर, दि. ५ (पीसीबी) – आरक्षण मिळावे ही मराठा समाजाची रास्त मागणी आहे. हा प्रश्न ज्वलंत असून सरकार आरक्षण देण्यास प्रामाणिक नाही. त्यामुळे आश्वासन पूर्ण करता न आल्याने सरकारने जनतेची माफी मागावी आणि हात मोकळे करावे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (रविवार) येथे केली.  

पृथ्वीराज चव्हाण एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत, नोकर भरती, मराठा आरक्षण, सांगली महापालिका निवडणूक आणि अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कोल्हापुरातील दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिया मांडला आहे. याठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांनी भर पावसात ठिय्या मांडला.

चव्हाण म्हणाले की, सांगली महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचा झालेला पराभव मान्य आहे. पैशाच्या जोरावर काँग्रेसचे कार्यकर्ते उचलायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे. ही कार्यपद्धती फार काळ टिकणार नाही, असे ते म्हणाले.