Maharashtra

मराठा आरक्षणाबाबत या महिनाअखेरपर्यंत वैधानिक कार्यवाही पूर्ण करणार – मुख्यमंत्री

By PCB Author

November 14, 2018

अकोला, दि. १४ (पीसीबी) –  मराठा आरक्षण अहवालावर या महिनाअखेरपर्यंत वैधानिक कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) येथे सांगितले. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही, असेही ते यावेळी म्हणाले. अहवाल फुटलेला नसून त्यासंदर्भात आलेल्या बातम्या म्हणजे पतंगबाजी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज जी मागणी करत होता, त्या मागणीचे भवितव्य अवघ्या काही तासात ठरणार आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे की नाही, यासाठी तयार करण्यात आलेला राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आज सरकारला सादर होणार होता. त्या पार्श्वभूमीवर अकोल्यात ते बोलत होते.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात गुरूवारी (दि. १५) मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल सादर होत आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. सुमारे दोन लाख निवेदने, ४५ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. आरक्षणाचा अहवाल राज्य सरकारला  सादर झाल्यानंतर सरकार आपले प्रतिज्ञापत्र मागासवर्ग आयोगाला देणार आहे.