Maharashtra

मराठा आरक्षणाबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, तरच आंदोलन मागे  

By PCB Author

July 30, 2018

औरंगाबाद, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (दि. ३१) संध्याकाळी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने सरकारला सात प्रश्नांची सूची ईमेलद्वारे पाठवली आहे. या मागण्या मान्य झाल्यास समन्वय समितीच्या सदस्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात येईल, असे समन्वयक विनोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या मागण्यांवर निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणालाही वैयक्तिक न सांगता प्रसार माध्यामाद्वारे तो जाहीर करावा, अशी मागणीही मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने केली आहे. तसेच राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेण्याची तारीखही जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत ४ तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. याची गंभीर दखल घेत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, असेही समितीने म्हटले आहे. आंदोलन करत असताना तरुणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही समन्वय समितीने आंदोलक तरुणांना केले आहे.