मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल गुरूवारी सादर होणार ?

0
466

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाने तयार केलेला अहवाल  गुरूवारी (दि.१५) सादर होण्याची शक्यता आहे. दरम्यान,  मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आज  (बुधवार) सादर होणार होता.   आयोग आज दुपारीच सरकारला अहवाल सादर करेल, अशी चर्चा सुरू  होती. परंतु आता अहवाल गुरूवारी सादर होणार असल्याचे बोलले जात आहे.

आम्ही आज संध्याकाळी किंवा गुरूवारी सकाळी राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहोत. त्यानंतर राज्य सरकार आपले प्रतिज्ञापत्र आम्हाला देईल. त्या प्रतिज्ञापत्रासह मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आम्ही उच्च न्यायालयात सादर करणार आहे, असे मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी  सांगितले.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही अहवाल आजच येणे अपेक्षित आहे, असे म्हटले होते. मात्र, अहवाल बंद पाकिटात असल्याने त्यावर बोलणे योग्य नाही, असे म्हटले होते. दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून  मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत आयोग कोणती शिफारस करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.