Maharashtra

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन खासदार हिना गावितांच्या गाडीवर हल्ला केल्याने नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद

By PCB Author

August 06, 2018

नंदुरबार, दि. ६ (पीसीबी) –  मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान रविवारी (दि.५) दुपारच्या सुमारास खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (सोमवार) नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार हिना गावित या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपस्थित होत्या. बैठक उरकुन गावित या बाहेर पडल्या असता मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी त्या बसलेल्या गाडीवर  हल्ला केला. यात सुदैवाने गावित यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेवेळी त्या प्रचंड घाबरल्या होत्या. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी आदिवासी भागात पसरली.

दरम्यान या घटनेमुळे रविवारी रात्री नागपूर-सुरत महामार्ग बंद पाडण्यात आला. तर आज (सोमवार) सकाळपासूनच नंदुरबार आणि नवापूरमध्ये बंदचा परिणाम दिसून आला. अनेक शाळांनी अघोषित शाळा बंद पाळला आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.