मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आमदारांची गुरूवारी बैठक  

0
505

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने  बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता भाजपने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली असून   भाजपचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.२) दुपारी २ वाजता भाजपच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत होणार आहे.  यावेळी राज्यातील मराठा आंदोलनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच  शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावले उचलावीत, याबाबत सर्व आमदारांशी चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता, तातडीने विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षण द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना आमदारांसोबत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली.