मराठा आंदोलकांनी उर्से टोला नाका येथे जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला

0
879

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवार) क्रांती दिनी महाराष्ट्र बंद पुकाराला आहे. या पार्श्वभूमीवर उर्से टोला नाका येथे मराठा आंदोलकांनी जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला. यावेळी आंदोलकांनी जोर जोरात घोषणाबाजी केली. तर खबरदारी म्हणून पोलिसांनी येथे सकाळपासूनच बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहतूक तुरळक सुरू होती. त्यामुळे महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. आज सकाळपासूनच महामार्गावर शुकशुकाट दिसून येत होता. अपवाद सोडल्यास तुरळक वाहतूक सुरू होती. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, कंपन्या, कार्यालये यांना आज (गुरूवारी) सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर न पडता घरी थांबणे पसंत केले आहे. काही मार्गावरील पीएमपी बसच्या फेऱ्या रद्द् करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणमध्ये केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान करण्यात आले होते. जोळपोळ, दगडफेकीत अनेकजण जखमी झाले होते. संतप्त जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे पोलिसांनी आज पाळलेल्या बंदमध्ये अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खबरदारी घेतली आहे. पोलीस सध्या वेशात तैनात करण्यात आले होते. तसेच ड्रोनद्वारे पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला पुण्यात हिंसक वळण लागले. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर काही आंदोलकांनी पीएमपी बसवर दगडफेक करुन बसच्या काचा फोडून नुकसान केले आहे. दरम्यान दगड फेकीनंतर बस लगेचच आगारात हलवण्यात आली.

काही आक्रामक आंदोलकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमावाने पोलिसांवर काचाच्या बाटल्या आणि चप्पलफेक केली. तसेच काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा, दिवे फोडले तर काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य प्रवेशव्दार तोडण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.