मराठवाडा जनविकास संघ व भगवानबाबा महासंघातर्फे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

0
521

चिंचवड, दि. ०४ (पीसीबी) : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व जय भगवानबाबा महासंघ यांच्या संयुक्तपणे गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश ढाकणे, कैलास सानप, वनविभागाचे अधिकारी रमेश जाधव, दत्तात्रय धोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यानिमित्त गरीब गरजू शंभर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवताना अरुण पवार म्हणाले, की गोपीनाथ मुंडे हे संघर्षशील नेते होते. त्यांनी शेतकरी, कामगार, सर्वसामान्य लोकांसाठी संघर्ष केला. म्हणूनच त्यांनी सर्वसामान्यांच्या देव्हाऱ्यात स्थान मिळवले. तोच वसा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत राहिले पाहिजे. स्वाभिमान व संघर्ष हे साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. मुंडे हे सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ होते. उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात माझा गणपती दूध पित नाही, असे ठणकावून सांगत अंधश्रेद्धेचे काहुर शमवले होते. म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळाली होती, अशा शब्दात अरुण पवार आदरांजली अर्पण केली.

गोपीनाथ मुंडे यांच्यावर भरभरून लिहिल्याविना महाराष्ट्राचा इतिहास पुर्णच होऊ शकणार नाही. ते दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होते, तरी त्यांचे लक्ष महाराष्ट्राकडेच असायचे. ‘घार फिरते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी अशी त्यांची अवस्था होती. महाराष्ट्रात परतेन, तर मुख्यमंत्री होण्यासाठीच, असे स्वप्न उराशी बाळगून त्यांची वाटचाल सुरु होती. आज गोपीनाथ मुंडे हवे होते, अशा शब्दात पदाधिकार्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.