Maharashtra

मरकजमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी स्वतःहून समोर येऊन प्रशासनाला मदत करावी

By PCB Author

April 01, 2020

 

दिल्ली, दि.१ (पीसीबी) – दिल्लीतील निजामुद्दीन इथे झालेला मरकज हा देशाची डोकेदुखी ठरला आहे. कारण एकाच ठिकाणी २००० हजाराहून अनेकजण एकाच ठिकाणी एकत्र आल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. त्या मरकजमध्ये महाराष्ट्रातीलही काही नागरिक सहभागी झाले होते.त्यामुळे अशा नागरिकांनी स्वतःहून समोर येऊन प्रशासनाला मदत करावी अशी विनंती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

केंद्रीय गृह खाते आणि राज्यातले गृह खाते एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दिल्लीत शंभरापेक्षा जास्त लोक निजामुद्दीनमधील या कार्यक्रमाला राज्यातून सहभागी झाले होते. मरकज कार्यक्रमाला गेलेल्या राज्यातील लोकांनी स्वतःहून समोर यावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. त्यातील काहीजण संपर्कात येताच त्यांना तात्काळ रुग्णालयात कोरोना बाधित झाले आहेत का? याबाबत टेस्टसाठी नेण्यात येत आहे.

निझामुद्दीन परिसरात ‘तब्लिग-ए-जमात’ हा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. जमातच्या मुख्यालयात १ ते १५ मार्च दरम्यान ‘तब्लिग-ए-जमात’ हा कार्यक्रम झाला होता. नमाज अदा करत असताना कोरोनाबाधित व्यक्तीमुळे २०० पेक्षा अधिक व्यक्तींना संसर्ग झाल्याची शंका आहे. भाविक सहभागी होऊन मूळगावी परतल्याने समूह संसर्गाची भीती आहे.