ममता बॅनर्जींचा धमाकेदार विजय; भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा ‘इतक्या’ मतांनी केला पराभव

0
440

कोलकाता, दि. २ (पीसीबी) – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. भाजपाची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे. अद्याप निवडणुकीच्या अधिकृत निकालाची घोषणा झालेली नाही, मात्र ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याचं चित्र स्पष्ट आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. एकीकडे करोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नाही. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.

ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपाने कडवं आव्हान निर्माण केलं होतं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला. यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आव्हानात्मक निवडणुकीला सामोरं जावं लागलं. प्रत्येक अपडेटसाठी लोकसत्तावरील हे लाईव्ह कव्हरेज पाहत राहा.