मनोहर पर्रीकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
669

पणजी, दि. १८ (पीसीबी) – देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले.  मीरामार बीच या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने भडाग्नी दिला. यावेळी  मनोहर भाई अमर रहें या घोषणा यावेळी देण्यात आल्या.  पर्रिकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता.

आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कला अकादमीपासून पर्रिकर यांची अंत्ययात्रा  काढण्यात आली. मोठा जनसागर या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. ‘मनोहर भाई अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर सहा वाजेच्या सुमारास मिरामार बीचवर त्यांच्यावर शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हवेत बंदुकीच्या २१ फैरी झाडत लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

यापूर्वी पणजीतील भाजपच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहिली.

मनोहर पर्रिकर यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज रविवारी संपली. दोनापौला येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि त्यांचे कुटुंबीय  आहेत. पर्रिकर यांच्या पार्थिवावर अंत्यंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.