मनोहर पर्रीकरांची प्रकृती खालावली; राजकीय घडामोडींना वेग, गोव्‍यात नेतृत्व बदलाची शक्‍यता

0
2235

पणजी, दि. १४ (पीसीबी) – मागील दोन दिवसांपासून कलंगुट येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यंमंत्री मनोहर पर्रीकर यांची आज (शुक्रवारी) प्रकृती खालावली. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोव्यात आता नेतृत्व बदल करणे अपरिहार्य आहे, असे मत राज्यातील भाजप नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना कळविले असून त्याबाबतचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी गोव्यात येणार असल्याची माहिती आहे.

आठ दिवसांपूर्वीच पर्रीकर उपचार घेऊन अमेरीकेहून परतले होते. मात्र या आठ दिवसांत त्यांनी कुणाचीही भेट घेतली नाही तसेच मंत्रालयाला जाणेही टाळले. बुधवारी (दि. १२) ते मंत्रालयात हजर होणार होते. मात्र त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना गुरूवारी कलंगुट येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर पर्रीकरांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना गुरूवारी (दि. १३) त्यांच्या पणजी येथील निवासस्थानी चर्चेसाठी बोलावल होत. मात्र ऐनवेळी या सर्व भेटी रद्द करण्यात आल्या. तसेच बुधवारपासून ते कुणाशीही फोनवर बोलले नाहीत. दुसरीकडे मनोहर पर्रीकरांच्‍या ढासळत्‍या तब्‍येतीमुळे राज्‍यातील नेतृत्‍व बदलाच्‍या हालचालींना वेग आल्‍याची माहिती आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार, राज्‍यातील कोअर कमिटीच्‍या सदस्‍यांनी पक्षश्रेष्‍ठींशी संपर्क साधून तातडीने नेतृत्‍व बदल करण्‍याची मागणी केली आहे. याबाबतचा आढावा घेण्‍यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींचे निरीक्षक बी. संतोष किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी गोव्यात येण्याची शक्यता आहे. हे नेते काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.