“मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत”

0
351

मुंबई,दि.१८(पीसीबी) – गोवा विधानसभा निवडणुकीत सध्या गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. उत्पल पर्रिकर यांना तिकीट देण्यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. उत्पल पर्रिकर यांनी तर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही दिला आहे. दरम्यान दुसरीकडे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत उत्पल पर्रिकर यांना सतत पाठिंबा दर्शवत असून पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केलं जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. मग तिकीट देण्याची चर्चा कधीपासून सुरु झाली. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिल्यास आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितल्यानंतर भाजपाची धावपळ सुरु झाली आहे. त्यांना तिकीट द्यावंच लागेल”.

दरम्यान “मी कोणतंही राजकीय भाष्य करत नाही. पण मनोहर पर्रीकर गोव्यातील प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचं योगदान आहे. आज गोव्यात जी भाजपा दिसत आहे त्यात मनोहर पर्रिकर यांचंच योगदान आहे. आजही गोव्यात भाजपा त्यांच्या नावाने ओळखली जाते आणि त्यांच्याच मुलाची औकात काढली जात आहे. गोव्यात, राजकारणात पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत हे चांगलं वाटलं नाही,” असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.