मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये राफेल घोटाळ्याचे रहस्य – काँग्रेस

0
716

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – राफेल घोटाळ्याचे रहस्य माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरूममध्ये आहे,  असा आरोप काँग्रेसने केला आहे. राफेलबाबत पर्रिकरांकडे मोठी माहिती असून ती बाहेर यायला हवी,  अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. देशाचा चौकीदार चोर असल्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला.

सुरजेवाला यांनी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे यांची एक ऑडिओ क्लिप सादर केली. यामध्ये राणे हे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये राफेल घोटाळ्याशी संबंधित माहिती असल्याचे म्हणत आहेत.  मला कोणीही काही करू शकत नाही. माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती आहे. माझ्या घरातील बेडरूमध्ये यासंबंधित कागदपत्रे आहेत, असे पर्रिकर म्हणाल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.

मोदी एकटे फ्रान्स, पॅरिसमध्ये गेले होते. त्यांच्या शिष्टमंडळात अंबानी होते. मात्र, आपले संरक्षण मंत्री त्यावेळी गोव्यात मासे खरेदी करत होते. याची चौकशी व्हायलाच हवी. मोदी हे संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. ते समितीलाही कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.