मनोरंजन क्षेत्रात लाॅकडाऊनचा पहिला बळी; आर्थिक विवंचनेतून टिव्ही कलाकाराची गळफास घेऊन आत्महत्या

0
424

मुंबई, दि.१८ (पीसीबी) :’आदत से मजबूर’ या नावाने सब टेलीव्हीजनवर प्रसिद्ध असलेल्या मालिकेतील कलाकार मनमीत ग्रेवाल याने शुक्रवारी आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. लाॅकडाऊनमुळे मनमीत बेरोजगार झाला होता. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने कर्जाचे हप्ते व राहत्या घराचे भाडे देणे सुद्धा शक्य होत नसल्याने मनमीत डिप्रेशनमध्ये गेला होता. ३२ वर्षीय मनमीत आपल्या पत्नीसह मुंबईत भाड्याने घर घेऊन राहत होता. मनमीत मनोरंजन क्षेत्रात लाॅकडाऊनचा पहिला बळी ठरला आहे.

मनमीत ग्रेवाल ने ‘आदत से मजबूर’ व ‘कुलदिपक’ या टिव्हीवरील मालिकेत काम केले आहे. मनमीतच्या मृत्यू बद्दल माहिती देताना त्याचे मित्र व प्रोड्यूसर मनजीत सिंग राजपूत यांनी सांगितले की, काही काळापासून मनमीत हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत होता. व्यक्तीगत कारणांमुळे त्याने कर्ज काढले होते. त्यात दोन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे कोणतेही काम नसल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. मनमीत काही मालिकेत व वेब सिरीज मध्ये काम करत होता. परंतु लाॅकडाऊनमुळे चित्रीकरण पूर्णपणे बंद झाले होते. कोरोनाचे संकट लवकर मिटण्याची चिन्ह दिसत नसल्याने आर्थिक अडचणींमुळे मनमीतला कर्जाचे हप्ते आणि व घरभाडे भरणे शक्य होत नसल्याने तो डिप्रेशनमध्ये गेला होता, असे मनजीत सिंग राजपूत यांनी सांगितले.

मनमीतच्या अत्महत्येची माहिती देताना त्याच्या पत्नीने सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे आम्ही सोने गहाण ठेऊन ४५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. आर्थिक विवंचनेमुळे मनमीतने हे चुकीचे पाऊल उचलले. फाशी घेतल्याची कळल्यावर त्याच्या पत्नीने आरडाओरडा करुन शेजारच्यांकडे मदत मागितली. गळफास लावलेला अवस्थेत मनमीतचे पाय तीने उचलून धरले व मानेवरील आवळलेला दुपट्टा कापण्याची विनंती जमलेल्या लोकांना केली, परंतु कोरोनाच्या भीतीने कोणी हात लावायला सुद्धा तयार होइना. मदतीसाठी बोलावलेल्या पोलिस व डाॅक्टराने देखील दुपट्टा कापण्यासाठी मदत केली नाही. आखेर बिल्डिंगच्या वाॅचमॅनने दुपट्टा कापून मनमीतला खाली उतरवले. त्यानंतर मनमीतला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र दवाखान्यात गेल्यावर त्याला मृत घोषीत करण्यात आले.