मन:स्वास्थ्याला नवचैतन्य देणे काळाची गरज – कृष्णकुमार गोयल

0
323

पुणे, दि.29 (पीसीबी) – ‘लॉकडाऊनच्या काळात मन:स्वास्थ्यासाठी काम करणे ही काळाची गरज आहे. सध्याच्या काळात लोकांची मानसिकता खचत चालली आहे. अशा परिस्थितीत शरीराबरोबरच मनाला सुदृढ करण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात सुरू झालेली नवचैतन्य हास्ययोग व्याख्यानमाला हे सकारात्मक जगण्याचे वरदान देत आहे. संस्थेचा हा उपक्रम व्याख्यानमालेच्या क्षेत्रात नवा पायंडा निर्माण करत आहे. ‘ असे विचार कोहिनूर समूहाचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल यांनी मांडले.

नवचैतन्य हास्ययोग परिवार पुणे आयोजित ऑनलाईन व्याख्यान मालेचे पहिले पुष्प प्रा. मिलिंद जोशी यांनी गुंफले. ‘हास्य ..जीवनाचे संगीत’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, उपक्रम प्रमुख व हास्ययोगतज्ज्ञ मकरंद टिल्लू उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कृष्णकुमार गोयल होते. ऑनलाईन दीपप्रज्वलन करून युट्युब व फेसबुक लाईव्ह मार्फत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी बोलताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले ,
‘ विनोदबुद्धी क्षीण होणे ही सांस्कृतिक अधोगती आहे. हास्ययोग हा सर्वश्रेष्ठ योग आहे. हास्य हे सर्वात उत्तम औषध आहे. हास्य आणि विनोदबुद्धी यांचे वरदान केवळ माणसांनाच लाभले आहे. असे असतानाही आपण खळखळून हसलो तर आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे अनेकांना वाटते. त्यामुळे माणसे हसत नाहीत. ‘

प्रा जोशी पुढे म्हणाले, ‘ एखाद्या सुंदर कवितेला सुरेख चाल लागली की त्या कवितेचे सुरेल गीतात रूपांतर होते. हास्य हे जीवनाचे संगीत आहे. या जगातले दुःख नाहीसे करता येत नाही. पण ते हलके करून जीवन सुंदर करण्याचे सामर्थ्य हास्यात आणि विनोदात आहे. विनोद बुद्धीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचे चिलखत घातले की सर्व संकटांना हसत सामोरे जाता येते. देवाला अन्नाचा नैवेद्य दाखविला जातो. हास्य हा आत्म्याचा नैवेद्य आहे. देवादिकांनी समुद्र मंथन केले त्याना चौदा रत्ने सापडली पण विनोद नावाचे रत्न त्यांना सापडले नाही. कारण त्यासाठी संसारातील अनुभवांचे मंथन करावे लागते. मनाने निर्मळ आणि निखळ असणारी माणसेच निर्विष विनोद करू शकतात. जीवनातल्या कठीण प्रसंगातही हास्य लोपू न देणे यातच माणसाची खरी कसोटी असते.’

संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल काटे म्हणाले , ‘ नियमित व्यायाम व हास्ययोग यामुळे संस्थेच्या 180 शाखा व 15000 हुन अधिक सदस्यांच्या तब्येती उत्तम आहेत.’
या उपक्रमाची संकल्पना हास्ययोग तज्ज्ञ मकरंद टिल्लू यांची असून मनाने सुदृढ माणसे तयार करण्यासाठी हास्य, मनोबल व स्वास्थ्यवर्धक तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद टिल्लू यांनी केले.