Maharashtra

मनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार?

By PCB Author

September 20, 2019

मुंबई, दि. १९ (पीसीबी) –  ‘ईडी’कडून चौकशी झाल्यापासून मौनात गेलेल्या राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे राज ठाकरे निवडणूक लढवण्यास राजी झाले असून मनसे राज्यात किमान १०० जागा लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थात, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

भाजपकडून ‘ईव्हीएम’ मॅनेज होत असल्याची ठाम समजूत झालेल्या राज यांनी सुरुवातीपासूनच निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. अन्य विरोधी पक्षांनाही त्यांनी तसे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यांनाही राज यांचा हा विचार पटलेला दिसत नव्हता. पक्ष टिकवायचा असेल तर निवडणूक लढली पाहिजे, असाच सर्वांचा सूर होता.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मनसेची महत्त्वाची बैठक झाली. त्यात मनसेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची मत जाणून घेतली. निवडणूक लढवायची झाल्यास आपली किती तयारी आहे, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादसह काही ठराविक शहरांत १०० च्या आसपास जागा लढण्याचा निर्णय झाल्याचे समजते. मात्र, नेमकं काय होणार? मनसे लढणार की नाही, यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.