मनसे राष्ट्रवादीसोबत येईल, असे वाटत नाही – शरद पवार 

0
871

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या आमच्या पक्षातील नेत्यांसोबत दिसत आहेत. काही प्रश्नांवर आमच्या सोबतही दिसत आहेत. असे असले तरीही ते येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्या सोबत रहातील, असे वाटत नाही, असे ऱाष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनीही  येत्या निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार नाही, असा दावा केला आहे. त्यामुळेच मुंबईतील कोणतीही जागा मनसेसाठी सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असेही अहिर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासोबत दिसत आहेत. राज यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नातही राष्ट्रवादीचे नेते आले होते. इतरही प्रमुख पक्षांचे नेते या लग्नात होते. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांची राज यांची वाढती जवळीक पाहता मनसे राष्ट्रवादीबरोबर आघाडी करेल, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मनसे राष्ट्रवादीबरोबर येण्याची शक्यता कमी आहे.