मनसेला महाआघाडीत घेण्याचा विचार; दोन्ही काँग्रेसचे नेते निर्णय घेणार – अजित पवार

0
369

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा  निवडणुकीसाठी महाआघाडी  करण्यात येणार आहे. त्यासाठी शेकाप, शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा  सुरू आहे. तसेच मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत विचार आहे. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी पक्षाची आढावा बैठक घेण्यासाठी अजित पवार येथे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी राफेलचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवरील आहे, असे सांगून राज्य स्तरावरील माझ्यासारख्या कार्यकर्त्याने त्यावर  बोलणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, यामध्ये  हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.  संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे राज्य सरकारने मागे घेतल्याची खात्रीशीर माहिती नसल्याने त्यावर उपमुख्यमंत्रिपद भूषविलेल्या व्यक्तीकडून लगेच प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले.