मनसेची मोर्चेबांधनी फक्त पुणे शहरासाठी, पिंपरी चिंचवडकडे दुर्लक्ष

0
380

पुणे, दि. ११ (पीसीबी) – महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोमाने कामाला लागली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून आजपासून दोन दिवस ते पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. पुणे शहरात मनसेचे लक्ष आहे, पण मागच्यावेळी जिथे चार नगरसेवक विजयी झाले होते त्या पिंपरी चिंचवडकडे साफ दुर्लक्ष केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात मनसेचे सचिन चिखले हे एकमेव नगरसेवक असून राज ठाकरे यांचा चाहतावर्गही मोठा आहे.

आज आणि उद्या ते मुक्कामी आहेत. मनसेच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचसोबत मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत.
पुढील आठवड्यात ते तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. 16 ते 18 जुलै या कालावधीत ते नाशिक येथे असतील. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे हे दौरे महत्त्वाचे असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यांमुळे मनसैनिक नव्या उत्साहाने कामाला लागण्याची शक्यता आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात भाजपाची सत्ता असून गतवेळी पराभाव झाल्याने दुखावलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधनी करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेनेही पिंपरी चिंचवडचा आगामी महापौर शिवेसनेचाच असेल अशी घोषणा मुख्य प्रवतक्ते खासदार संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस अशी महाआघाडी करून पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायची व्युहरचना सुरु आहे. सत्ताधारी भाजपाचे प्रदेश नेते स्थानिक आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप बेसुध्दा भाजपाची सत्ता कायम राखण्यासाठी जोरबैठका काढत आहेत. मनसेला खूप चांगली संधी असूनही राज ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.