मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पुणे पोलिसांकडून भाजपला मदत; काँग्रेसचा आरोप

0
936

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंध जोडून पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज (सोमवार) येथे केला.

भीमा कोरेगाव हिंसाचारासंदर्भातील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने  पुणे पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. तरीही पुणे पोलिसांचे अधिकारी प्रसारमाध्यमांशी जाणीवपूर्वक  बोलत आहेत. भाजपला मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मदत व्हावी, असा त्यांचा हेतू आहे. पुणे पोलिस सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे प्यादे बनले आहे, अशीही टीका सावंत यांनी यावेळी केली.

दरम्यान, नक्षलींनी लिहिलेल्या पत्रांमध्ये दिग्विजय सिंग यांचा मोबाईल नंबर आढळून आल्याने दिग्विजय सिंग यांची चौकशी केली जाऊ शकते, असे पुणे पोलिसांनी म्हटले आहे. नक्षलवादी प्रकाश याने सुरेंद्र गडलिंग याला लिहीलेल्या पत्रात दिग्विजय सिंग यांच्या मोबाईल नंबरचा उल्लेख केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासादरम्यान पुणे पोलिसांनी ही माहिती  समोर आणली आहे.