मध्यप्रदेशात सत्ता आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा स्थापन करण्यास बंदी – काँग्रेस

0
847

भोपाळ, दि. ११ (पीसीबी) – मध्यप्रदेशात सत्ता आल्यास सरकारी इमारत आणि परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा स्थापन करण्यास बंदी घालण्यात येईल, असे काँग्रेसने प्रसिध्द केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

या जाहीरनाम्यात प्रभू राम, नर्मदा, गोवंश आणि गोमूत्राचा उल्लेख करून सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात आला आहे.  सत्ता आल्यास सरकारी इमारती आणि परिसरात संघाला शाखा उभारण्यास मनाई केली जाईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखेत भाग घेण्याची परवानगी देणारा सरकारी अध्यादेश रद्द करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

त्याचबरोबर चित्रकूटमधून सुरू होणाऱ्या राम पथ गमनचीही निर्मिती करण्यात येणार आहे. शिवाय नर्मदा नदीच्या संरक्षणासाठी माँ नर्मदा न्यास अधिनियम तयार करण्यात येईल. तसेच नर्मदा परिसरात ११०० कोटी रुपये खर्च करून विश्रामगृहे बांधण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. त्याशिवाय रोजगार, शेतकरी आणि सामाजिक सुरक्षेवरही या वचननाम्यात भर  दिला आहे.