Desh

मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान   

By PCB Author

May 20, 2019

भोपाळ , दि. २० (पीसीबी) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. त्यानंतर  मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ यांना पुन्हा बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी दिले आहे. याबाबत त्यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही केली आहे.

कमलनाथ यांनी राज्यातील महत्त्वाच्या विषयांसह बहुमत सिद्ध करावे, यासाठी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र लिहिणार  आहे, असे भार्गव यांनी  सांगितले. सदनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी कलमनाथ यांचे सरकार माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या घरावर कागदपत्रे फेकण्याचे काम करत आहे, असे भार्गव यांनी म्हटले आहे.

दरम्यान,  रविवारी प्रसिध्द झालेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपला  अधिक जागा मिळण्याचा   अंदाज वर्तविला आहे. एबीपी माझा आणि नेल्सनच्या एक्झिट पोलने मध्य प्रदेशात भाजपला  २२ तर काँग्रेसला अवघ्या ७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.