मध्यप्रदेशात अमित शहांच्या स्वागतासाठी ३०० क्विंटल फुले  

0
520

इंदोर, दि. २४ (पीसीबी) – देशातील ५ राज्यातील विधानसभा  निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारात आरोप -प्रत्यारोपांची राळ उठवली जात आहे.  मध्यप्रदेशातही काँग्रेस आणि भाजपमध्ये कट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. तेथील प्रचाराची २६ नोव्हेंबररोजी सांगता होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर त्याचदिवशी भाजपचे  अध्यक्ष अमित शहा यांचा  रोड शो आयोजित करण्यात आला  आहे.  या रोड शोसाठी पक्षाने ३०० क्विंटल फुले मागविली आहेत. त्यामुळे शहरात या रोड शो बद्द्ल उत्सुकता लागून राहिली आहे.   

इंदोर शहरातील प्रमुख मार्गावरून  हा रोड शो होणार आहे. त्यासाठी   भाजपचे कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.   रोड शोच्या मार्गावरील दुकाने व घरामध्ये फुलांचे वाटप करण्यात येणार आहे. ही फुले  शहा यांना देऊन त्यांचे अनोखे पध्दतीने स्वागत करण्याचे नियोजन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, चौथ्यांदा मध्यप्रदेशात पुन्हा  सत्ता मिळवण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान  यांनी कंबर कसली आहे. अमित शहा यांच्याही जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी रोड शो करून मतदारांना आकृष्ट करून वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी मध्यप्रदेश भाजपने  हा रोड शो यशस्वी करण्यासाठी  सर्व यंत्रणा कामाला लावली आहे.