Desh

मध्यप्रदशातील कॅबिनेट मंत्री इमरती देवी यांचा उल्लेख ‘आयटम’ म्हणून केल्याने काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांच्या विरोधात उद्रेक

By PCB Author

October 19, 2020

भोपाळ, दि. १९ (पीसीबी) – मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री इमरती देवी यांना माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी आयटम म्हटल्यावरून सध्या मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तर आज या वक्तव्याच्या निषेधार्थ मौन बाळगले असून, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून, कमलनाथ यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी देखील मागणी केली आहे.

या सर्व घडाडमोडींच्या पार्श्वभूमीवर आता कमलनाथ यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. एका सभेत बोलताना कमलनाथ म्हणाले, ” मी काहीतरी म्हटले होते, कोणचा अपमान करण्यासाठी नव्हते म्हटले…मला केवळ नाव आठवत नव्हते. ही यादी आयटम नंबर १, आयटम नंबर २ दाखवते, हा अपमान आहे का? शिवराज सिंह हे तर कारणं शोधत आहेत. मी अपमान केल्याचं म्हणत उपोषणास बसले. कमलनाथ कोणाचा अपमान करत नाही. मी तर सत्यासोबत तुमची पोलखोल करतो.”

मध्यप्रदेशच्या डबरा मतदार संघातून काँग्रेसचे सुरेंद्र राजेश हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी कमलनाथ आले होते. तेव्हा त्यांनी आमचे सुरेंद्र राजेश हे अत्यंत सरळ साध्या स्वभावाचे आहेत. ते त्यांच्यासारखे नाहीत, काय आहे त्यांचं नाव? मी त्यांचं नाव काय घेऊ, तुम्ही तर त्यांना चांगलं ओळखता, तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं.. काय आयटम आहे. असं म्हणत कमलनाथ यांनी इमरती देवी यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. यानंतर मोठा वाद उफाळल्याचे दिसत आहे.