मतमोजणी दिवशी मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

0
429

मुंबई, दि. २० (पीसीबी) – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघात सोमवारी (दि.२१)  मतदान होत आहे.  तर गुरूवारी (दि.२४ ) निवडणुकीची मतमोजणी  होणार आहे.  या दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यापासून मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने  दिली आहे.

न्यायाधीश उज्वल भूयान यांनी  शुक्रवारी १९५१ साली लागू केलेला लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम १३५ सी अंतर्गत हा आदेश दिला आहे. या कायद्यानुसार सर्व देशी दारु, ताडी आणि अन्य मद्यविक्री दुकान मालकांनी मतदानाच्या एक दिवस आधी  संध्याकाळी ६ वाजल्यानंतर दुकान बंद ठेवावीत. ही सर्व दुकाने मतदानाच्या दिवशी  आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी  संपूर्ण दिवस बंद राहतील. तसेच मतमोजणीच्या दिवशी  दारु विक्रीची दुकान बंद ठेवावीत, असेही या निर्णयात म्हटले होते.

परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने  या निर्णयात बदल  करत मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर मद्यविक्रिची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.

मुंबईत जिल्हाधिकाऱ्यांनी ४ ऑक्टोबर रोजी मतदानादिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला महाराष्ट्र वाईन मर्चंट्स असोसिएशनने कडाडून विरोध करत  न्यायालयात धाव घेतली होती.  जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर करताना मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी ६ नंतर अन्य जिल्ह्यात दुकाने सुरु ठेवण्यात यावी, असे म्हटले आहे.  मात्र, या आदेशातून  मुंबईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे  हा संपूर्ण आदेश हा मनमानी असून यामुळे व्यवसाय करणाऱ्या अधिकाऱ्यावर गदा येऊ शकते,  असे वाईन मर्चंट असोसिएशन यांनी म्हटले होते.