मतमोजणीच्या दिवशी देशातील सर्व मोबाईल टॉवर बंद ठेवा – गोपीचंद पडळकर  

0
554

सांगली, दि. २२ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या पारदर्शकपणावर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. याबद्द्ल निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. आता तर मतमोजणीवेळी ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणी वेळी देशातील सर्व मोबाईल टॉवर बंद करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे येथे चुरशीची तिरंगी लढत झाली. पडळकर यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलताना ईव्हीएमविषयी शंका उपस्थित केली आहे.

पडळकर म्हणाले की, मतमोजणीच्या ठिकाणापासून ५  किलोमीटर अंतरावरील मोबाईल टॉवर मतमोजणीच्या दिवशी  बंद करण्यात यावे,  नाहीतर मतदान यंत्रात घोळ होण्याची शक्यता आहे. देशातील सर्व मोबाईल टॉवर त्यावेळी बंद करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्षांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करून मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती.