मतदानासाठी ११ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार; मतदानाला जाताना एक तरी पुरावा सोबत ठेवा

0
729

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदार ओळखपत्राशिवाय ११ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदार यादीत नाव असूनही निवडणूक ओळखपत्र नसलेल्यांनी यापैकी एक पुरावा दाखविल्यास त्यांना मतदान करता येणार आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र असणे आवश्यक आहे. नसेल तर पासपोर्ट, वाहनचालक परवाना, केंद्र, राज्य सरकारचे ओळखपत्र, सरकारमान्य खासगी कंपनीचे ओळखपत्र, बँक पासबुक, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य ओळखपत्र, आधार कार्ड हे पुरावे मतदान केंद्रांवर ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.

मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची पडताळणी www.nvsp.in या वेबसाइटवर करता येते. केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा ११ पैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक राहील.