मतदानावर पावसाचे सावट; पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

0
662

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह मध्य महाराष्ट्रात  पुढील  ४८ तासांत  हलक्या ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच  महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता  आहे.  त्यामुळे  सोमवारी (दि.२१) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या  मतदानावर  पावसाचे सावट असून मतदानाचा टक्का घसरू शकतो. याची  भीती सर्वपक्षीय उमेदवारांना लागून राहिली आहे.

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेनसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अशीही शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे.  तर आज (रविवार) कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सातारा आणि कोल्हापूरला  पावसाने   झोडपून काढले.

सोमवारी मुंबई, पालघर, ठाण्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, औरंगाबादमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.  तर धुळे आणि नंदूरबारमध्ये आकाश निरभ्र राहणार आहे.