मतदानाच्या ४८ तास आधी सोशल मीडियावर बंदी घाला – निवडणूक आयोग

0
724

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार बंदी केली जाते. त्याधर्तीवर मतदानाच्या ४८ तास आधी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि न्यूज पोर्टलवरील प्रचारावर  बंदी घालण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला पत्र लिहून करण्यात आली आहे.   

मतदारसंघांमध्ये मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात येते. मात्र, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि वेब पोर्टलवर प्रचार सुरूच असतो. त्यावरही निर्बंध घालण्यात यावेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. प्रचार बंदीच्या काळात केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या पदाधिकाऱ्यांकडे आलेल्या तक्रारीचीच न्यायालयाने दखल घ्यावी, असेही आयोगाने पत्रात म्हटले आहे.

या पत्राला विधी मंत्रालयाने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १३ फेब्रुवारी रोजी समाप्त होत आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या ४८ तास आधी सोशल मीडियावर बंदी येण्याची शक्यता कमी आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, सेक्शन १२६ अंतर्गत केवळ सभा, रॅली आणि निवडणूक प्रचारावर बंदी आहे. तसेच  इलेक्ट्रॉनिक मीडियावरून प्रचार करण्यासही बंदी आहे. त्यामुळेच आयोगाने या कायद्याच्या कक्षेत सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियाला आणण्याचा सल्ला दिला आहे. प्रिंट मीडियात राजकीय पक्षांकडून मतदानाच्या दिवशीही प्रचाराच्या जाहिराती दिल्या जातात. यावर बंधने  आणण्याबाबत निवडणूक आयोग गांभीर्याने विचार करत आहे.