मजूर परतल्याने महापालिकेचे भोजन बंद

0
428

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनाथ, बेघर, मजूर, अडकलेले परप्रांतीय कामगार, झोपडीधारक यांच्यासाठी सुरू केलेली दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था महापालिकेने आता बंद केली आहे. सुरवातील अवघ्या १५ हजार नागरिकांना देण्यात येत होते, पण मागणी वाढत गेली आणि अखेरच्या टप्प्यात रोज तब्बल सव्वा लाख लोकांना भोजन देण्यात आले.

२५ मार्च पासून कोरोनाचा बंद सुरू झाला. त्यावेळी बाजारपेठा बंद झाल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचे जेवणाचे हाल सुरू झाले होते. भटके, अनाथ, भिक्षेकरी, बांधकाम मजूर, घरकाम करणाऱ्या मोकलरणी तसेच आपल्यया गावी जाता न आल्याने रखडलेले परप्रांतीय मजूर यांची उपासमार सुरू झाली.संचारबंदीच्या काळात या नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी भोजन योजना सुरू केली. सुरवातील बजाज उद्योग समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांनी त्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला. इस्कॅन किचमच्या माध्यमातून रोज १५ हजार लोकांच्या भोजनाची सोय झाली होती. पुढे २७ एप्रिल पासून महापालिका, तहसिलदार यांच्याकडे रोज हजारो उपाशी लोकांची यादी येऊ लागली. त्यांना जेवण देण्याची जबाबदारी महापालिकेवर आली. संख्या वाढत वाढत पंधरा दिवसांत ५० हजारावर गेली. इस्कॅन कमी पडते म्हणून शहरातील आठ संस्थांकडे जेवण पुरविण्याचे काम सोपविण्यात आले. महापालिका त्यांना गहू, तांदूळ, तुरडाळ, तेल, मसाला देत होती. संबंधीत आठ संस्था स्वतः भाजी खरेदी करून भोजन पुरविण्याचे काम करत होत्या. सलग ५४ दिवस हे काम सुरू होते. नागरिकांची मागणी तब्बल सव्वा लाख लोकांपर्यंत गेली होती. मंगळवार (१९ मे) पासून ही व्यवस्था पालिकेने बंद केली.

भोजन बंद करण्याचे कारण देताना, परप्रांतीय कामगार आपल्या गावी गेले आहेत, त्यामुळे आता ही व्यवस्था बंद केल्याचे महापालिका प्रशासन सांगते. आताच्या लॉकडाऊन शहरातील सर्व एमआयडीसी तसचे दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे आता भोजन बंद करावे अशी सुचना महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी दिली होती, त्यावर बैठकीत शिक्कामार्तब झाले आणि व्यवस्था बंद केल्याचे आधिकाऱ्यांनी सांगतिले.

आरोप प्रत्यारोप कारणीभूत –
भोजन देताना दोन वेळचे जेवण, नाष्टा यासाठी महापालिकेने ज्यांना कंत्राट दिले होते ते ४८० रुपये दराने दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँगेस नेत्यांनी केला. या भोजन योजनेत सत्ताधारी भाजपाने मोठा भ्रष्टाचार केल्याचे आरोप अन्य काही नेत्यांनी केले. फक्त कागदोपत्री बिले काढण्यात आली, सव्वा लाख लोकांर्यंत जेवण पोहचलेच नाही असे आरोप झाले. अधिक वाच्यता होऊ लागल्याने अखेर व्यवस्था गुंडाळण्यात आल्याचे समजले.