Maharashtra

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे राज्यभर घंटानाद, भजन आणि उपोषण

By PCB Author

October 13, 2020

मुंबई,दि.१३(पीसीबी) : राज्यातील व्यवहार पूर्वपदावर येत असली तरी देवाची दारं अजूनही बंदच आहेत. मंदिराची दारं खुली करण्यासाठी भाजपने आज सकाळी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्यानुसार सर्वत्र मंदिरांच्या बाहेर घंटनाद, आरती, उपोषण अशा पध्दतीने आंदोलन सुरू करण्यात आले. “मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार” अशा घोषणांसह जोरदार आंदोलन छेडले आहे.

अनलॉकमध्ये बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र असं असलं तरी राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. याचविरोधात राज्यभरात आज भाजपने मंदिर उघडा आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील विविध शहर आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, कार्यकर्ते आंदोलन करणार आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर घंटनाद भाजपने आज सकाळी 11 वाजता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दारात घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आणि नगरसेवक सहभागी झाले. दरेकर यांनी राज्य सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.

पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर वाद्यांचा गजर करत आंदोलन पुण्यात शहर भाजपच्या वतीने आज मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं. शहराचे ग्रामदैवत असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर विविध वाद्यांचा गजर करत हे आंदोलन करण्यात आलं. कुंभकर्णासारख्या गाढ झोपलेल्या सरकारला प्रतिकात्मक जागे करण्याचा प्रयत्न असल्याने यावेळी भाजपकडून सांगण्यात आलं.