मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा ; कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभागी व्हावे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

0
186

मुंबई, दि. २७ (पीसीबी): ठाकरे सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करुन ठेवली आहेत. आता सर्व व्यवहार सुरळित केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत. म्हणुनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सोमवार दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडी चे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी केली आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे. आपल्या परिसरातील प्रमुख मंदिरे तसेच धार्मिक स्थळांसमोर टाळ,घंटा व शंख वाजवून मंदिर हम खुलवायेंगे । धर्म को न्याय दिलायेंगे ॥ हा नारा देत आंदोलन करावे. अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी केली.