मंत्र्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ बंदी; मोदींचे मंत्र्यांना आदेश

0
391

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – सर्व मंत्र्यांनी सकाळी ९.३० वाजता कार्यालयात हजर राहावे, तसेच घरून काम करणे बंद करावे, असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहे. इतरांपुढे आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही, तर ४० दिवसांच्या संसदेच्या अधिवेशनकाळात कुणीही बाहेचे दौरे काढू नयेत, असे आदेशही पंतप्रधानांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान दिले.

गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण वेळेवर कार्यालयात पोहोचत असू, असे मोदींनी बैठकीत सांगितले. मंत्री आणि खासदारांमध्ये फार अंतर नसते, त्या मुळे मंत्र्यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना भेटीसाठी वेळ दिला पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. मंत्र्यांनी ५ वर्षांचा कार्यक्रम आखून त्यानुसार काम करावे आणि याचा परिणाम येत्या १०० दिवसांमध्ये दिसायला हवा, असे आदेश मोदींनी मंत्र्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बैठकीत मंत्रिमंडळाने मार्च २०१९ च्या उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षणासंदर्भातील नव्या अध्यादेशाला मंजुरी दिली. या द्वारे ७००० शिक्षकांची भरती केली जाणार आहे.