मंत्री राम शिंदेच्या घरात शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्या बांधाव्यात – अशोक चव्हाण

0
636

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – चारा नसेल, तर जनावरे पाहुण्यांच्या घरी नेऊन बांधा, असा अजब सल्ला देणाऱ्या जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या घरात शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्या बांधाव्यात, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

चव्हाण विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी  राम शिंदे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.  चव्हाण म्हणाले की, राम शिंदे हे एक जबाबदार मंत्री आहेत. ते असे बेजबाबदार वक्तव्य कसे काय करू शकतात ? शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्या मेंढ्या खुशाल राम शिंदे यांच्या घरी  नेऊन बांधाव्यात, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राम शिंदे यांच्या विधानावर टीका केली आहे.  ते म्हणाले की,  राज्य सरकारचे मंत्री किती असंवेदनशील झाले आहेत, याचा हा पुरावा आहे . दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. तर दुसरीकडे चारा छावण्या सुरु करण्याऐवजी  मंत्री शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच करत आहेत . मुख्यमंत्र्यानी अशा मंत्र्यांना समज द्यावी, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, पाथर्डी येथे  पालकमंत्री राम शिंदे यांची शेतकऱ्यांनी भेट घेऊन  दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नसल्याचे सांगितले. जनावरांची चाऱ्या अभावी उपासमार होत असल्याचे  सांगितले. यावर  चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.