मंचर येथे २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याची सुखरुप सुटका

0
612

मंचर, दि. २१ (पीसीबी) – पुण्यातील मंचर येथे २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची अखेर सुखरुप सुटका करण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. तब्बल १५ तासांनी मुलाला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात आले.

रवी पंडित (वय ६) असे बोअरवेलच्या बाहेर काढण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रवी खेळता खेळता २०० फुट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. या परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरु असून अनेक कामगार या कामात सहभागी आहेत. रवीचे आई-वडिलही बांधकाम मजूर असल्याने तोही आई-वडिलांसोबत याठिकाणी होता. बोअरवेलवर कोणतेही झाकण नसल्याने खेळता-खेळता रवी थेट २०० फुट खोल बोअरवेलमध्ये पडला. सुरुवातीला तो केवळ १० फुटांवर अडकला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. नंतर एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. यानंतर त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु झाले होते. अंधार पडल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. पण अखेर १५ तासांनी अथक पर्यतनानंतर रवीला बोअरवेलच्या बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, संबंधित घटनेत जे कोणी दोषी असतील किंवा आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक खराडे यांनी दिली आहे.