भ्रष्टाचार करून घेतलेल्या आरामदायी गाडीला खड्ड्‌यातूनच जायचे आहे – कौशल इनामदार  

0
1289

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार करून तुम्ही कितीही आरामदायक गाडी घेतली तरी तुम्हाला शेवटी याच खड्डयांच्या  रस्त्यांवरुन जायचे आहे, असे ट्विट करून  संगीतकार कौशल इनामदार यांनी राज्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, या कौशल यांच्या विधानाचा नेटीझन्सनी आदित्य ठाकरे यांच्या गाडीशी जोडला आणि कौशल इनामदारांनी शिवसेनेवर टीका केली, अशी चर्चा सुरु झाली.

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे  शुक्रवारी नाशिकला जात असताना घोटीजवळ त्यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर फुटल्याची घटना समोर आली होती.  ही घटना ताजी असतानाच कौशल इनामदार यांनी शनिवारी सकाळी एक ट्विट केले. रस्त्यांच्या कंत्राटात भ्रष्टाचार करून तुम्ही कितीही आरामदायक गाडी घेतलीत तरी तुम्हाला शेवटी याच खड्डेवाल्या रस्त्यांवरुन जायचे आहे, असे त्यांनी  म्हटले होते.

दरम्यान,  अनेकांनी कौशल इनामदार यांच्या ट्विटचे समर्थन केले. तर काहींनी तुम्हाला भाजपाचा भ्रष्टाचार दिसत नाही का, असा सवाल केला. अखेर कौशल इनामदार म्हणाले, मी शिवसेनेचे नावही घेतले नाही. आणि खरं सांगायचं तर माझ्या मनातही शिवसेनेचं नाव आलं नाही. मी देवगड ते कोल्हापूर प्रवासात आहे आणि रस्त्याची गत इतकी वाईट आहे की ते ट्विट मी केलं. तुम्ही का उगीच स्वतःवर ओढवून घेताय?, असे त्यांनी म्हटले आहे.