“भोसरी- शास्त्रीचौकातील मलनि:स्सारण वाहिनीची दुरूस्ती करा”: भाजपा नगरसेवक सागर गवळी

0
370

– महापालिका जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांना निवेदन

पिंपरी, दि.२७(पीसीबी) – भोसरी येथील शास्त्री चौकात चार-पाच दिवसांच्या अंतराने मलनिस्सारण लाइन तुंबत असल्याने मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे महापालिका जलनि:सारण विभागाने तात्काळ कार्यवाही करुन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक सागर गवळी यांनी केली आहे.

याबाबत महापालिका जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी-आळंदी रस्त्यावरील सर्वात गजबजलेला चौक अशी शास्त्री चौकाची ओळख आहे. याठिकाणी दाट लोकवस्ती आहे.खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, एटीएम, दवाखाने यांची संख्या अधिक आहे. तर रहिवाशांची संख्यादेखील ५० हजारांच्या आसपास आहे. महापालिकेच्या वतीने टाकण्यात मलनिस्सारण लाइन आलेली वारंवार तुंबत आहे. त्यामुळे दुर्गंधीयुक्त मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना पायी जाणे अवघड होत आहे. या चौकातच पीएमपीचा बसथांबा असल्याने प्रवाशांना नाईलाजाने नाक मुठीत धरून बसची वाट पाहत थांबावे लागत आहे.

विशेष म्हणजे, दिवसा अथवा रात्रीदेखील अचानकपण कधीही समस्या उद्भवत असल्याने या ठिकाणचे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर या कालावधीत परिसरातील व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे. ही समस्या वारंवार उद्भवत असल्याने वेळीच यावर न केल्यास उपाययोजना या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका मलनि:सारण विभागाने तात्काळ कार्यवाही करुन संबंधित मलनि:सारण वाहिनीची दुरुस्ती करावी, असेही भाजपा नगरसेवक सागर गवळी यांनी म्हटले आहे.