Notifications

भोसरी रुग्णालय खासगीकरणाला भाजप नगरसेवक रवि लांडगेंचा विरोध; भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचा घरचा आहेर

By bpimpri

February 08, 2019

पिंपरी, ता. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि भविष्यासाठी घातक ठरणारा आहे. खासगीकरणानंतरही ते चालवण्यासाठी वरून वर्षाला २० कोटी रुपये मोजणे म्हणजे महापालिकेचा उफराटा कारभार आहे. महापालिकेने उभारलेल्या मालमत्तेसोबतच करदात्या नागरिकांनी घाम गाळून भेरलेला कररूपी पैसा सुद्धा पळवण्याचा हा प्रकार निंदनीय आणि घृणास्पद आहे. गोरगरीब रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी उभारलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करून त्या माध्यमातून खासगी डॉक्टरांचे चांगभले करण्याच्या या प्रकाराला माझा तीव्र विरोध असल्याचे भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडगे यांनी सांगितले. रुग्णालय खासगीकरणाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोध करायचा होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे आपणाला ही संधी मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालय खासगीकरणाच्या निर्णयामुळे भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.