Banner News

भोसरी रुग्णालय खासगीकरणाला भाजप नगरसेवक रवि लांडगेंचा विरोध; भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचा घरचा आहेर

By bpimpri

February 08, 2019

पिंपरी, ता. ८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि भविष्यासाठी घातक ठरणारा आहे. खासगीकरणानंतरही ते चालवण्यासाठी वरून वर्षाला २० कोटी रुपये मोजणे म्हणजे महापालिकेचा उफराटा कारभार आहे. महापालिकेने उभारलेल्या मालमत्तेसोबतच करदात्या नागरिकांनी घाम गाळून भेरलेला कररूपी पैसा सुद्धा पळवण्याचा हा प्रकार निंदनीय आणि घृणास्पद आहे. गोरगरीब रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी उभारलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करून त्या माध्यमातून खासगी डॉक्टरांचे चांगभले करण्याच्या या प्रकाराला माझा तीव्र विरोध असल्याचे भाजपचे बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवि लांडगे यांनी सांगितले. रुग्णालय खासगीकरणाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोध करायचा होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे आपणाला ही संधी मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालय खासगीकरणाच्या निर्णयामुळे भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात नगरसेवक रवि लांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरी गावठाणातील गावजत्रा मैदानाजवळ रुग्णालयासाठी चार मजली इमारत उभी केली आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. या इमारतीत चांगल्या दर्जाचे रुग्णालय सुरू करून गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधा देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यासाठीच तर महापालिका नागरिकांकडून कर वसूल करते. परंतु, महापालिकेने हे रुग्णालय खासंगी संस्थेचा चालवण्यास देण्याचा अत्यंत चुकीचा आणि घातक निर्णय घेतला आहे. महापालिका रुग्णालयाचे खासगीकरण करून ते चालवणाऱ्या संस्थेला वर्षाला २० कोटी रुपये मोजणार आहे. महापालिकेचा हा उफराटा कारभार न समजणारा आहे. इमारत महापालिकेची, आतील सोयी सुविधा महापालिकेच्या, वैद्यकीय उपकरणे महापालिकेची असे असताना केवळ ते चालवण्यासाठी म्हणून वर्षाला २० कोटी देणे म्हणजे शहरातील नागरिकांची सरळसरळ फसवणूक करणारा प्रकार आहे.

भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाला शहराच्या सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तसेच या निर्णयामुळे भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोपही पक्षावर आणि पदाधिकाऱ्यांवर होऊ लागले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या निर्णयाला माझा तीव्र विरोध आहे. या निर्णयाचा फेरविचार करून नागरिकांमध्ये पक्षाप्रती विश्वास निर्माण करण्याची आपण पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार आहे. भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेत असताना स्थानिक नगरसेवकांना अजिबात विश्वासात घेतले गेलेले नाही. रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय सर्वसाधारण सभेपुढे आल्यानंतरच नगरसेवकांना त्याबाबत माहिती मिळाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला माझा विरोध करण्याचा निर्धार होता. परंतु, ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा गोंधळ घातला. या विषयावर चर्चाच झाली नाही आणि मलाही माझी बाजू मांडणे शक्य झाले नाही.

महापालिका सभागृहात भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरण विषयावर साधकबाधक चर्चा झाली असती, तर अनेक मुद्दे समोर आले असते. प्रशासनालाही या विषयाचा फेरविचार निश्चितच करावा लागला असता. मात्र तसे होऊ शकले नाही. परंतु, आता सुद्धा अजून वेळ गेलेली नाही. महापालिका प्रशासनाने करदात्या नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या मालमत्तांबाबत अशा प्रकारचे घातकी निर्णय घेऊन चुकीचा पायंडा पाडण्याचे काम करू नये. रुग्णालयाच्या खासगीकरणातून मूठभर लोकांचे हित साधण्याऐवजी गोरगरीब रुग्णांना त्यांनीच भरलेल्या कररूपी पैशातून चांगली सुविधा देणे गरजेचे आहे. रुग्णालय महापालिकेमार्फत चालवणे हे प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. त्याचा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विसर पडता कामा नये. या विषयावरून सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पक्षावर चिखलफेक होत आहे. त्याचा पक्ष पदाधिकाऱ्यांनी कोठे तरी विचार करावा आणि भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येऊ नये.

रुग्णालय खासगणीकरणाला आपला तीव्र विरोध राहिल. भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे म्हणणे होते की, समाजातील प्रत्येक गरीब माणसाला पक्षाचा व पक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेची मदत व उपयोग झाला पाहिजे. परंतु, त्यांच्या या म्हणण्याच्या विरोधात सध्या महापालिकेत कृती सुरू आहे. भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणामुळे गरीब रुग्णांची विवंचना होणार आहे. त्यातून पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात कृती घडणार आहे. ती पक्षाला हानी पोचवणारी आहे. त्याहूनही अधिक गोरगरीब रुग्णांना हानी पोचवणारी आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बाबींचा गांभीर्याने विचार करावा. भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या मंजूर प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये. हे रुग्णालय महापालिकेनेच चालवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.”