Banner News

भोसरी मतदारसंघातील रेडझोनचा प्रश्न १५ वर्षांपासून “जैसे थे”; जाणून घ्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी काय प्रयत्न केले

By PCB Author

April 02, 2019

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील रेडझोनचा प्रश्न कळीचा मुद्दा आहे. दिघी, चऱ्होलीचा परिसर, तळवडे, चिखलीचा खूप मोठा परिसर रेडझोनने बाधित आहे. सलग १५ वर्षांपासून खासदार म्हणून मिरवणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या प्रश्नाचा वापर केवळ मते मिळवण्यासाठी आणि राजकारणासाठी वापर केला. हा प्रश्न महिनाभरात सुटेल, दोन महिन्यात सुटेल, सहा महिन्यात सुटेल असे अनेकदा आश्वासन देऊन खासदार आढळराव पाटील यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना १५ वर्षांपासून “एप्रिल फूल” बनविले आहे. यंदाच्या निवडणूक प्रचारातही हा प्रलंबित प्रश्न प्रमुख मुद्दा असणार आहे. आता आढळराव पाटील आणखी किती दिवस मूर्ख बनविणार आहेत हे एकदाच जाहीर करावे, अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आधीच्या खेड लोकसभा मतदारसंघातून एकदा आणि मतदारसंघांच्या पुनर्ररचेनंतर तयार झालेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजय मिळविला आहे. याचाच अर्थ आढळराव पाटील हे सलग १५ वर्षे खासदार आहेत. सलग १५ वर्षे खासदार म्हणून काम करताना आढळराव पाटील यांनी मतदारसंघातील कोणते प्रमुख प्रश्न सोडवले याचा लेखाजोखा मांडल्यास मतदारांच्या पदरी निराशा पडल्याशिवाय राहत नाही. विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांवर तर आता आढळराव पाटील नकोच अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील खूप मोठा परिसर रेडझोनने बाधित होतो. त्यामुळे येथील मतदार खूप त्रस्त आहेत. तळवडे, चिखली, रुपीनगर, त्रिवेणीनगर, सेक्टर क्रमांक २२, दिघी, चऱ्होली व परिसर तसेच भोसरीचा काही परिसर रेडझोनच्या हद्दीत येतो. रेडझोनची हद्द कमी झाल्यास या भागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारशी निगडीत हा प्रश्न खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोडविणे अपेक्षित होते. लष्कराशी संबंधित असलेला हा प्रश्न सुटणे अवघड असल्यास तसे मतदारांना सांगण्याचा प्रामाणिकपणा आढळराव पाटील यांनी दाखवणे गरजेचे होते. प्रत्यक्षात आढळराव पाटील यांनी या प्रश्नाचे भांडवल केवळ मते मिळवण्यासाठी केल्याचे दिसून येते.

गेल्या १५ वर्षांपासून आढळराव पाटील हे रेडझोनची हद्द कमी होणार असल्याचे केवळ आश्वासन देत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात आढळराव पाटील २००९ मध्ये एक शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत गेले होते. तत्कालिन संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर खासदार आढळराव पाटील यांनी रेडझोनचा प्रश्न एक महिन्यात सुटणार असल्याचे जाहीर केले होते. त्याला आता दहा वर्षे उलटली. परंतु, आजतागायत रेडझोनची हद्द कमी झाली नाही. दरम्यानच्या काळात आढळराव पाटील यांनी रेडझोनचा प्रश्न दोन महिन्यात सुटेल, सहा महिन्यात सुटेल, असे अनेकदा आश्वासने दिली.

२०१४ च्या निवडणुकीतही आढळराव पाटील यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा रेडझोन होता. मोदी लाटेत मतदारांनी त्यांना तिसऱ्यांदा खासदार केले. केंद्रात सत्ता पालटली आणि भाजप-शिवसेना सत्ताधारी बनले. आपल्याच पक्षाचे सरकार असूनही आढळराव पाटील यांना रेडझोनचा प्रश्न सोडवता आलेला नाही. आढळराव पाटील या प्रश्नांवर गेल्या पाच वर्षांत अगदी कमी वेळा बोलले. २०१९ च्या निवडणुकीतही आढळराव पाटील यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा रेडझोनच असणार आहे. एखादी व्यक्ती सलग १५ वर्षे खासदार असूनही आपल्या मतदारसंघातील रेडझोनचा प्रश्न सुटत नसेल आणि मतदारांना केवळ एप्रिल फूल बनविले जात असेल, तर मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत खरंच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.