Bhosari

भोसरी, च-होलीत दोन घरफोड्या; दीड लाखांचा ऐवज लंपास

By PCB Author

August 06, 2021

भोसरी, दि.6 (पीसीबी) : भोसरी, च-होली परिसरात दोन घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 5) एमआयडीसी भोसरी आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एक लाख 53 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

सुनिता धनश्याम पंचमिंड (वय 53, रा. समर्थ कॉलनी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 4) दुपारी साडेबारा ते गुरुवारी (दि. 5) दुपारी सव्वा बारा वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

मीरा रघुनाथ भिसे (वय 48, रा. पद्मावती मंदिराच्या शेजारी, च-होली) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बुधवारी (दि. 4) रात्री नऊ ते गुरुवारी (दि. 5) सकाळी सहा वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपड्यांच्या बॅगमध्ये ठेवलेले 28 हजार रुपये किमतीचे एक तोळा सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.