Bhosari

भोसरी एमआयडीसी येथील कंपनीची पावने दोन कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

By PCB Author

September 14, 2018

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीकडून १ कोटी ७० लाख ४ हजार ७५० रुपयांचा माल तयार करून घेऊन त्यांचे बिल न देता फसवणूक केली. तसेच कंपनीच्या मालकाला शिवीगाळ करुन खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली.  ही घटना ४ फेब्रुवारी २००२ ते १२ सप्टेंबर २०१८ दरम्यान घडली.

कुल्लुवित्तील मथ्थाई जॉनी (वय ७३, रा. एमआयडीसी भोसरी) असे धमकी देण्यात आलेल्या कंपनीच्या मालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नेल्वीन पी. वर्गीस (रा. नेल्वीन इंटरप्रायजेस, लांडेवाडी, भोसरी), पी आय वर्गीस, जॉन्सन सुवर्णा (दोघे रा. सुवर्णा फायब्रोटक प्रा. लि., भोसरी) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नेल्वीन, पी.आय वर्गीस  आणि जॉन्सन  यांनी मिळून ४ फेब्रुवारी २००२ ते १२ सप्टेंबर २०१८ दरम्यान जॉनी यांच्या भोसरी एमआयडीसी येथील कंपनीतून १ कोटी ७० लाख ४ हजार ७५० रुपयांचा माल तयार करून घेतला. त्यासाठी आरोपींच्या कंपनीकडून रीतसर वर्क ऑर्डर काढण्यात आली होती. परंतु आरोपींनी झालेल्या कामाची रक्कम जॉनी यांना दिली नाही. तसेच तयार केलेला माल देखील परत केला नाही. यामुळे जॉनी यांनी आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला. यामुऴे आरोपींनी जॉनी यांना खोट्या तक्रारीमध्ये फसविण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. यावरून जॉनी यांनी न्यायालयात तक्रार दिली. न्यायालयाने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यानुसार भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.