भोसरी एमआयडीसीत अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

0
438

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – कामावरुन पायी घरी निघालेल्या एका कामगाराचा अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉक क्र.५५ येथे घडली.

चन्नाप्पा वैजनाथ बेल्लुरे (वय ५७, रा. विकास कॉलनी, लांडेवाडी, भोसरी) असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा बसवराज चन्नाप्पा बेल्लूरे (वय ३१) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रात्री पावणेआठच्या सुमारास चन्नाप्पा हे कंपनीतले काम आटपून पायी घरी निघाले होते. ते भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉक क्र.५५ येथे पोहचले असता भरधाव अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकऱणी त्यांचा मुलगा बसवराज याने सोमवार (दि.१० जुन) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.